Pune: दारु विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यापाराला 40 लाखांना फसवल्याची (Fraud Case) घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी दाम्पत्य सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी आयकर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून फिर्यादी व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, शुभम गौर आणि रंजना गौर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. तर, पमेश्वर कुचेकर असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव असून ते जमीन विक्रीशी संबंधित काम करतात. फिर्यादी आणि आरोपी गेल्या काही वर्षांपासून ऐकमेकांना ओळखत होते. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांच्यात चांगली मैत्री झाली. दरम्यान, आरोपीने पुण्यात नवीन फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे सांगत फिर्यादीकडे उसणे 15 लाख रुपये मागितले. एवढेच नव्हेतर, आरोपीने फिर्यादीला वेगवेगळे आमिष दाखवत त्याच्याकडून 40.5 लाख रुपये उकळले. परंतु, आरोपी दाम्पत्य पुण्यातून फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी दाम्पत्याने याआधीही अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपी दाम्पत्य फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Nanded LeT Case प्रकरणी मुंबईतील NIA च्या स्पेशल कोर्टाने लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांनी सुनावली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

याच पार्श्वभूमीवर पेट्रोलपंपाचा परवाना काढून देतो, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार मुंबई शहरात घडला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कडक कारवाई करत बिहारमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्रात विविध शहरात एकाच दिवशी फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी कोणतेही व्यवहार करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.