धक्कादायक! पुण्यात ‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धक महिलांची फसवणूक; शेवटची फेरी होण्याआधी आयोजक पसार
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

अनेक मातांचे ‘इंडियाज सुपर मॉम’ (India's Super Mom) बनण्याचे स्वप्न क्षणार्धात धुळीस मिळाले आहे. इतकेच नाही तर या प्रक्रियेमध्ये अशा मातांची मोठी फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. ‘इंडियाज सुपर मॉम’ बनण्यासाठी देशभरातून 44 महिला आल्या होत्या, त्यांची शेवटची फेरी होण्याआधीच आयोजक आपला गाशा गुंडाळून फरार झाले आहेत. या प्रकरणी या महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महत्वाचे म्हणजे ही घटना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune) इथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुहिन दास आणि तनुश्री दास यांनी ‘इंडियाज फस्ट सुपर मॉम’ या नावाने सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगलोर, अहमदाबाद अशा ठिकाणी ही स्पर्धा घेतली गेली. त्याचे व्हिडिओज सर्वत्र व्हायरल करून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर या स्पर्धेची शेवटची फेरी 21 जुलैला पुण्यातील हडपसर येथे आयोजित केली होती. यासाठी देशभरातून 45 महिलांची निवड करून, त्यांच्याकडून प्रत्येकी 20 हजार रुपये घेतले गेले होते. या अंतिम फेरीसाठी कृणाल कपूर, सुधाचंद्रन, रुसलान मुमताज असे मोठे कलाकार जज म्हणून येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र फेरीसाठी जेव्हा सर्व स्पर्धक आणि त्यांचे नातेवाईक स्थळी पोहचले तेव्हा त्यांना तो कार्यक्रम रद्द झाला असल्याचा सांगितले गेले. चौकशी केली असता, तुहिन दास आणि तनुश्री दास दोघेही गायब असल्याचे आढळले. या दोघांसाठी जे लोक पुण्यात काम करत होते त्यांच्याकडूनही या दोघांनी पैसे उकळले होते. या दोघांचे फोन बंद आहेत, आतापर्यंत सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्ट डीलीट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपली चक्क फसवणूक झाली असल्याचे सिद्ध झाल्याने अनेक महिलांच्या पायाखालची वाळू सरकली. (हेही वाचा: ATM द्वारे होणाऱ्या फसवणुकीत देशात महाराष्ट्र अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या किती रुपयांचा झाला घोटाळा)

या स्पर्धेसाठी 20 हजार प्रवेश फीसोबत इतर अनेक खर्च पकडून प्रत्येक महिलेने जवळजवळ 50 हजार खर्च केला आहे. यासाठी हे सर्व लोक आता सायबर पोलिसांकडे तक्रार करणार आहेत.