Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हॉल मालकांविरोधात गुन्हा दाखल
BMC | (Photo Credits: Facebook)

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. मुंबईत नियंत्रणात आलेला करोना पुन्हा वाढू लागल्याने महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्नात फक्त 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील लग्न समारंभात 200 ते 300 हून अधिक वऱ्हाडी जमल्याने मुंबई महापालिकेने 3 हॉल मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्वाचे म्हणजे, या लग्न समारंभात बहुसंख्य वऱ्हाड्यांनी मास्कदेखील न लावल्याचे माहिती समोर आली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने प्रत्येक विभागात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यातच शुक्रवारी रात्री सीएसटी रोड कलिना, सांताक्रुझ पूर्व येथील ग्रँड यशोधन लॉन, गुरूनानक हॉल आणि नूर बँक्वेट या ठिकाणी धाड टाकली असता तिन्ही ठिकाणी कोरोना खबरदारीचे सर्व नियम मोडून कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या तिन्ही हॉल मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईकरांची चिंता वाढली! कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज मोठी वाढ

मुंबईत आज (28 फेब्रुवारी) एकूण 1 हजार 51 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 32 लाख 25 हजार 915 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 3 हजार 860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 11 हजार 470 मृत्युची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 9 हजार 715 रुग्ण सक्रिय आहेत.