Pune: पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे आज (5 जुलै 2021) दुपारी दीड वाजताच्या उघडकीस आली आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याचे दार ठोठावल्यानंतरही आतून प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता महिला पोलीस कर्मचारी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

श्रद्धा जायभाय (वय, 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असून पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास होत्या. त्यांचा विवाह झालेला असून त्यांचे पती हे भारतीय नौदलात कार्यरत आहेत. तर, त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, त्यांनी काल रात्री त्यांच्या मुलीला नातेवाईकांच्या येथे सोडून घरी गेल्या. त्यानंतर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती लोकसत्ताने दिली आहे. हे देखील वाचा- Covid-19 Vaccination in Pune: पुण्यात 18 वर्षांवरील नागरिकांना सर्व केंद्रावर मिळणार लस

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा यांची एक मैत्रीण त्यांना काल रात्रीपासून फोन करत होती. त्यानंतर सकाळीही फोन केला. परंतु, श्रद्धाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या मैत्रिणीने तेथे राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीला त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार, ती व्यक्ती श्रद्धा यांच्या घरी गेली. परंतु, दार ठोठावूनही आतून प्रतिसात न मिळाल्याने त्यांनी वाकड पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.