Farm Laws: केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत जेष्ठ नेते शरद शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; जाणून घ्या काय म्हणाले
Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेल्या अनेक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्यांच्या (Farm Laws) विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याबाबत केंद्र व शेतकरी दोघेही मागे हटायला तयार नाहीत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले आहेत की, वादग्रस्त कृषी कायद्यांना पूर्णपणे नाकारण्याऐवजी, त्यातील शेतकऱ्यांना अडचण असणाऱ्या काही भागात सुधारणा करण्यात यावी. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा एक गट केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांना विचारण्यात आले की शेतकर्‍यांच्या मागणी लक्षात घेता महाराष्ट्र सरकार केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणेल का? त्यास उत्तर देताना ते म्हणाले की, ‘संपूर्ण विधेयक नाकारण्याऐवजी ज्या भागाविषयी शेतकऱ्यांना आक्षेप आहे त्या भागामध्ये आपण बदल करू शकतो. ते पुढे म्हणाले की, या कायद्याशी संबंधित सर्व पक्षांनी एकत्र विचारविनिमय केल्यावरच ते विधानसभेमध्ये टेबलावर आणले जाईल.’

देशाचे माजी कृषिमंत्री राहिलेले शरद पवार म्हणाले की, ‘हा कायदा पास करण्यापूर्वी राज्यांनी त्यातल्या वादग्रस्त बाबींचा विचार केला पाहिजे व त्यानंतरच निर्णय घ्यावा. महाराष्ट्राच्या दोन दिवसीय अधिवेशनात हे होईल असे मला वाटत नाही. जर का हा मुद्दा विधानसभेमध्ये उभा राहिला तर त्याचा विचार केला पाहिजे.’ (हेही वाचा: Mahadev Jankar: मी पंतप्रधान होणारच, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली : महादेव जानकर)

ते पुढे असेही म्हणाले की, 'मंत्र्यांचा एक गट या कायद्याचा विचार करीत आहे. जर हा गट शेतकर्‍यांच्या बाजूने काही चांगले व आवश्यक बदल आणत असेल तर या कृषी कायद्यांविरोधात ठराव आणण्याची गरज नाही.' केंद्राकडून कृषी कायद्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारे शरद पवार पुन्हा म्हणाले की, 'हे लोक गेल्या 6 महिन्यांपासून निषेध करीत आहेत. शेतकरी व केंद्र यांच्यातील परिस्थिती चिघळत चालली आहे. केंद्राने या शेतकर्‍यांशी बोलले पाहिजे. खुद्द केंद्रानेच या प्रकरणात पुढाकार घ्यावा.'