Fact Check: Mumbai CST Platform येथे प्रवाशांची गर्दी जमल्याचा 'तो' व्हिडिओ जुना, सरकारचा ट्विटरद्वारे खुलासा
(File Photo)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. प्रत्याक्षात राज्य अथवा केंद्र सरकारने अधिकृतपणे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. दरम्यान, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाटांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल मेसेजची दखल घेऊन पीआयबी (Press Information Bureau) ने या व्हिडिओबाबत खुलासा केला आहे. पीआयपी (PIB) ने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ जुना आहे. प्रत्यक्षात नजीकच्या काळात किंवा सध्यास्थितीत अशी कोणतीही घटना सीएसएमटी स्थानकावर घडली नाही. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करु नये, असे पीआयबीने म्हटले आहे.

गेल्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्यानंतर अल्पावधीत काही ट्रेन सुरु झाल्या तेव्हा लोकांमध्ये अनेक समज गैरसमज सुरु झाले होते. यातून मुंबई शहरातील अनेक ठिकाणी परप्रांतीय आणि स्थलांतरीत कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या गर्दीवरुन मोठे राजकारणही पाहायला मिळाले होते. ही गर्दी पांगविण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या शथापीने परिस्थितीवर नियंत्रण मिळव जमावाला पांगवले.

गेल्या वर्षी (2020) सुरु झालेला कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर अद्यापही कायम आहे. मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली होती. परंतू, राज्यात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत कोरोना नियंत्रणाचा भाग म्हणून राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध मोडणाऱ्यांवर कडक कारवाईही करण्यात येत आहे. (हेही वाचा, )

दरम्यान, मुंबई शहराची वाहिणी अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल ट्रेन प्रवासाकडे मुंबईकर प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा मोठा फटका मुंबई लोकल सेवेला बसल्याचे बोलले जात आहे. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50% इतकी करण्यात आली आहे. काही ठिकाणी कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर खासगी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबविण्यास सांगण्यात आले आहे.