माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती
दत्ता पडसलगीकर (संग्रहित संपादित प्रतिमा)

माजी पोलिस महासंचालक (DGP) दत्ता पडसलगीकर (Datta Padsalgikar) यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी-अंतर्गत सुरक्षा (Deputy NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई अतिरेकी हल्ल्यासह अनेक हाय-प्रोफाइल घटनांच्या चौकशीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय त्यांनी एटीएस, रॉ आणि आयबीमध्येही काम केले आहे. पडसलगीकर हे 1982 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम पाहतील. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल दत्ता पडसलगीकर यांना  राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.

दोन राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार निवृत्त होत असल्याने दत्ता पडसलगीकर  यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. पडसलगीकर यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. उस्मानाबाद आणि साताऱ्याचे ते अधीक्षक होते. आता पडसलगीकर यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. (हेही वाचा: नवे सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?)

दत्ता पडसलगीकर  यांनी मुंबई पोलिस आयुक्त म्हणूनही काम पहिले आहे. काउंटर टेरर ऑपरेशन्समध्ये दीर्घ अनुभव असलेल्या पडसलगीकर  यांनी, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानविरूद्ध पुरावे गोळा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दत्ता पडसलगीकर हे एकमेव पोलिस अधिकारी होते ज्यांनी सर्वप्रथम 26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड केले होते. जवळजवळ एका दशकापासून ते इंटेलिजेंस ब्युरोमध्ये काम करत आहेत. अमेरिकेसह अनेक दूतावासांमध्येही त्यांनी काम केले आहे. पडसलगीकर यांनी आपल्या मुत्सद्दी भाषणामुळे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगले नेटवर्क तयार केले आहे.