ED Raids Ajit Pawar's relatives' house: अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
Ajit Pawar |

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय असलेल्या जगदीश कदम (Jagdish Kadam) यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने छापा टाकला आहे. जगदीश कदम हे अजित पवार यांचे मामेभाऊ तसेच दौंड शुगरचे विद्यमान संचालक आहेत. ईडीने केलेली कारवाई ही दौंड शुगर्स (Daund Sugar) आणि जरंडेश्वर साखर कारखाना संदर्भातील असल्याचे बोलले जात आहे. ईडीकडून या आधीही अजित पवार यांचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांना रडारवर घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

दौंड शुगर संदर्बात ईडीला काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ईडीने दौंड शुगरशी संबंधीत काही लोकांची या आधी चौकशी केली होती. दरम्यान, आता विद्यमान संचालक जगदीश कदम यांची चौकशी आणि थेट निवासस्थानी छाप्याचीच कारवाई करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या बहिणींच्या पुणे आणि कोल्हापूर येथील निवास्थानीही या आदी ईडीने छापे टाकले होते. या छाप्यांत ईडीच्या हाती नेमके काय लागले याचा कोणताही तपशील अद्याप बाहेर आला नाही. तोवर आता पुन्हा एकदा इडीने अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर कारवाई सुरु केली आहे. या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, Ajit Pawar यांचे पुत्र Parth Pawar यांच्याही कार्यालयावर आयकर विभागाचा छापा)

दरम्यान, यापूर्वी प्राप्तीकर विभागाने आलेगाव दौंड येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात सात ऑक्टोबर रोजी सकाळी शोध मोहिम सुरू केली होती. विशेष म्हणजे या कारवाईत कोणत्याही प्रकारे स्थानिक अथवा महाराष्ट्र पोलीस पाहायल मिळाले नाहीत. या वेळी केवळ केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते.या वेळी प्राप्तीकर विभागाने पुणे येथे जगदीश कदम यांची चौकशी केली होती. तसेच, कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार व करविषयक बाबींची चौकशी वीरधवल जगदाळे यांच्याकडे केली होती.