ECI Explanation On Sharad Pawar Notice: शरद पवार यांना खरोखरच नोटीस मिळाली? निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिले होते. निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशावरुन आयकर विभागने (CBDT ) शरद पवार यांना नोटीस पाठवल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. या वृत्ताबाबत खुद्द निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांना अशा कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नाही, असे या स्पष्टीकरणात म्हटले आहे. एनआय या वृत्तसंस्थेने निवडणुक आयोगाचा हवाला देत याबाबत वृत्त दिले आहे.

शरद पवार यांना नोटीस पाठवल्याच्या वृत्तावरुन प्रसारमाध्यमांमध्ये मंगळवारी जोरदार चर्चा झाली. या वृत्तामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या तर अनेकांना यात राजकीय संदर्भ दिसले. काहींनी याबाबत अधिकृत माहिती नसल्याचेही म्हटले. दरम्यान, या सर्व चर्चेनंतर आता प्रत्यक्ष निवडणूक आयोगानेच स्पष्टीकरण दिले आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Election Affidavits: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याबाबत निवडणूक आयोगाची CBDT कडे विनंती)

निवडणूक आयोगाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने केल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाने निवडणूक आयोगाच्या निर्देशावरुन नोटीस पाठवल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. परंतू, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी कोणताही नोटीस शरद पवार यांना बजावण्यात आली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांना निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी नोटीस मिळाल्याचे वृत्त होते. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरुन ही नोटीस बजावल्याचे वृत्त होते.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवेसना आमदार अॅड. अनिल परब यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री या दोघांचेही प्रतिज्ञापत्र योग्य आहे. त्यात कोहीही चुकीचे नाही. अशा पद्धतीची पडताळणी करणे ही नियमीत प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व नाही. दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली होती की, अशा प्रकारच्या प्रक्रिया नियमीत घडत असतात. त्याला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. दरम्यान, शरद पवार यांना बाजवण्यात आलेल्या नोटीशीबाबत्या वृत्ताचे स्वत: निवडणूक आयोगानेच खंडण केले आहे.