Bird Flu: चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होतो? पाहा काय म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने (Bird Flu) थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) त्याचा शिरकाव झाला असून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, बर्ड फ्लूमुळे मांसाहार करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच चिकन खावे की नाही? असाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तसेच चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होतो का? यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

"बर्ड फ्लू या विषाणूचा प्रसार पक्षांच्या चोचांमधून होतो. यामुळे मानवी शरिरात बर्ड फ्लूचा प्रसारत खूप कमी प्रमाणात होतो. चिकन खाल्ल्याने बर्ड फ्लू पसरत नाही. व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्याने या रोगाचा धोका टळतो", असे राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच "परभणीत कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत", असेही ते म्हणाले आहेत. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनंतर मांसाहार करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Bird Flu in Parbhani Update: परभणीत बर्ड फ्लू मुळे झालेल्या कोंबड्यांच्या मृत्यूनंतर 10 किमी अंतरावरील खरेदी विक्रीवर बंदी

परभणीसह राज्यातील काही भागात कोंबड्या, कावळे या पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याने खवैय्यांमध्ये चिकन खाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे. ज्यामुळे चिकन व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुरंबा गावातील 1 किमी अंतरावर असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना एकत्रित केले जाणार आहे. त्याचसोबत कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यासह गावातील सर्व नागरिकांची विषाणूची चाचणी केली जात आहे. यासाठी वैद्यकीय पथके येथे दाखल झाल्याची माहिती सुद्धा परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.