Devendra Fadnavis Meet Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Devendra Fadnavis Met Sharad Pawar (Photo Credits: Twitter)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (सोमवार, 31 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुंबई (Mumbai) मधील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आज सकाळी देवेंद्र फडवणीस पवारांच्या भेटीस गेले होते. याची माहिती खुद्ध फडणवीस यांनी ट्विटवर फोटो शेअर करुन दिली. यानंतर राजकीय वर्तुळाला चर्चेला उधाण आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आज महाविकास आघाडीचे नेते मेट्रो चाचणी उद्घाटन आणि मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1,2 च्या भूमिपूजनात व्यस्त असताना देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली. ही भेट अवघ्या 10 मिनिटांची होती, अशी माहिती समोर येत आहे. (मराठा आरक्षण प्रश्नी नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याची संभाजीराजेंची शरद पवारांना विनंती)

देवेंद्र फडणवीस ट्विट:

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले असावेत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर फडणवीस-पवार भेट झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.