देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवार यांच्या 'पॉवर गेम'मुळे भाजप अडचणीत

परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधिमंडळात सभागृहात बहुमत सिद्ध करताना संख्याबळ जमवताना भाजपला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे बंडखोर आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी अपेक्षीतरित्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात गेले दोन दिवस सुरु असलेल्या नाट्यावर मोठ्या रंजकपणे पडदा पडला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपही अडचणीत आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरही प्रचंड मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परिणामी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधिमंडळात सभागृहात बहुमत सिद्ध करताना संख्याबळ जमवताना भाजपला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमिचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज दुपारी 3.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद बोलावली आहे. ही पत्रकार परिषद बोलावण्याचे नेमके कारण किंवा त्याचा तपशील अद्याप पुढे आला नाही. मात्र, या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या चर्चांच्या आधारावर बोलायचे तर या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करु शकतात.

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी नवी आघाडी आकारास येत असताना आणि या आघाडीचे सरकार सत्तेत येण्याची चिन्हे असताना अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही अजित पवार यांनी राजभवनावर जात थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप आमदार देवेंद्र फडणीस यांनीही या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या इतिहासात ही एक अभूतपूर्व घटना होती. (हेही वाचा, हायव्होल्टेज बैठक; अजित पवार यांचे पुन्हा 'कहो दिल से राष्ट्रवादी फिर से'?; दादा परत फिरा! कुटुंबीयांकडून दबाव वाढला)

दरम्यान, अजित पवार यांना परत बोलावण्यासाठी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबीयांकडून निकराचे प्रयत्न सुरु होते. अनेक प्रयत्न करुनही अजित पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांना दाद लागू दिली जात नव्हती. परंतू, कौटुंबीक आणि राजकीय दबावापुढे नमते घेत अजित पवार यांनी आपला निर्णय बदलला. अखेर अजित पवार यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी या आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.