मुंबईत आज कोरोनाच्या आणखी 1554 रुग्णांची भर तर 57 जणांचा बळी; शहरातील COVID19 चा आकडा 80 हजारांच्या पार
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोरोनाच्या रुग्णांची प्रचंड वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान आता मुंबईत आज कोरोनाच्या आणखी 1554 रुग्णांची भर पडली असून 57 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 80 हजारांच्या पार गेल्याची माहिती म्युनसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई यांनी दिली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु नागरिकांनी सुद्धा आता घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.(COVID19 Cases In Dharavi: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 301 कोरोनाबाधित; दिवसभरात 19 नव्या रुग्णांची नोंद, तर 2 जणांचा मृत्यू)

राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जर नागरिकांनी कलम 144 च्या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तर दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सुद्धा नागरिकांना घरापासून 2 किमी पेक्षा अधिक अंतरावर जाऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच विनाकारण बाईक किंवा गाड्यांमधून फिरताना दिसल्यास ही कारवाई केली जाणार आहे.(महाराष्ट्र: COVID19 च्या परिस्थिती संदर्भात केंद्राकडून राज्य सरकारला कोणत्याही निधीची मदत नाही- विजय वडेट्टीवार)

दरम्यान, राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथिलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी अटी आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढणार असल्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. परंतु मृत्यूदर कमी करण्याकडे अधिक भर देण्यात येणार असल्याचे ही टोपे यांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 180298 वर पोहचला असून 8053 जणांचा बळी गेला आहे.