राज्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतू, यात बहुतांश नियम शिथिल असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत आता तातडीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या वेळी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले. त्यामुळे आज (मंगळवार, 20 एप्रिल) दुपारी 3.30 वाजता पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, राज्यात अंशत: लॉकडाऊन लावला असला तरी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. नागरिक, दुकानदार नियमांचे अनेकदा उल्लंघन करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला नियमांमध्ये शिथिलता असल्याने कारवाई करण्यावरही मर्यादा आहे. परिणामी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे आता लोकांकडूनच मागणी होत आहे की सरकारने कडक लॉकडाऊन लागू करावा. राज्य सरकारलाही त्या दृष्टीने गंभीर विचार करावा लागणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Remdesivir: दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांच्यावर काँग्रेसचा निशाण)
राज्यातील किराना दुकानंबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकानांसाठी सकाळी 7 ते 11 या वेळेतच दुकाने उघडण्यास परवानगी असू शकेल. दरम्यान, राज्य सरकारच्या संभाव्य निर्णयाबाबत किराणा दुकानदारांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. किराणा दुकाने ही अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे या दुकानांना जर वेळेचे बंधन घातले तर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडेल. त्यातून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू शकेल असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक आज पार पडत आहे. पंतप्रधान देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सायंकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होतो का याबाबतही उत्सुकता आहे.