Coronavirus In Pune: पुणे येथे कोरोनाचे एकाच दिवशी आढळले 4093 रुग्ण, शहरातील COVID19 चा आकडा 2 लाखांच्या पार
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबई नंतर आता पुण्यात (Pune) कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्याचे दिसून आले आहे. तर आता पुण्यात एकाच दिवसात 4093 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2 लाखांच्या पार गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पुण्यात आणखी 85 जणांचा बळी गेला असून एकूण मृतांचा आकडा 5536 वर गेला आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णसंख्येत वाढ होण्यापेक्षा जास्त; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी)

पुण्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,44,516 वर पोहचला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण बहुसंख्येने आढळून येत असल्याने विविध ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले होते. तसेच येथील काही नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगस कोरोनाच्या संबंधित नियम न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले होते. कोरोनावरील लस अद्याप उपलब्ध नसल्याने त्यावर संशोधन केले जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष कोरोनावरील लस कधी उपलब्ध होईल याकडे लागले आहे.(Curfew In Pune District: अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार)

दरम्यान, राज्यात  गेल्या  24 तासांत  21,656 नवे रुग्ण आढळले असून 405 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 लाख 67 हजार 496 वर  पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर पोहोचला आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील 24 तासांत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या प्रमाणापेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. काल दिवसभरात राज्यात 22,078 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात एकूण 8 लाख 34 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.