Coronavirus: कोरोना व्हायरस संसर्गातून बचावासाठी  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका दिवसात सुमारे 50 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शासनाकडून नागरिकांना वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही राज्यातील जनतेला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचं दुखणं अंगावर काढू नका. थोडा जरी त्रास झाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असे काहीही जाणवल्यास पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सध्याचे वातावरण पाहता थोडा जरी त्रास झाला. आपल्या प्रकृतीत काही बदल जाणवला तर लगेचच डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यांचा माझा अभ्यास सांगतो आहे की, अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाने उपचार घेण्यास बराच उशीर केला आहे. त्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. लोक दुखणं अंगावर काढतात. त्यातून त्रास वाढतो. अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्ण दवाखाण्यात दाखल होतो. त्यामुळे डॉक्टरांनाही उपचार करण्यास मर्यादा पडतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Covid 19 Vaccine Shortage: मुंबई मध्ये BKC Jumbo Vaccination Centre मध्ये तात्पुरता लसीकरणाला ब्रेक; संध्याकाळपर्यंत Covishield चा साठा मिळण्याची शक्यता; डीन Rajesh Dere)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतू, यात बहुतांश नियम शिथिल असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत आता तातडीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या वेळी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले. त्यामुळे आज (मंगळवार, 20 एप्रिल) दुपारी 3.30 वाजता पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

.