Mumbai Local: लसीकरण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला
Mumbai High Court (Photo Credit: ANI)

राज्यातील कोरोना निर्बंध शिथील असताना मुंबई लोकल मात्र अद्यापही सर्वसामान्यांसाठी खुली नाही. यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. मुंबईत बस प्रवास करताना होणारी गर्दी चालते मग मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना होणारी गर्दी का चालत नाही? असा खडा सवाल न्यायालयाने विचारला. यासोबतच ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे म्हणजेच ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्या नागरिकांना मुंबई लोकलसाठी स्वतंत्र पास देण्याची व्यवस्था करा, अशी सूचनाही न्यायालयाच्या मूख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारला केली. लसीकरण पूर्ण झालेले नागरिक, पत्रकारांबाबत सरकारने विचार करावा असेही न्यायालायने म्हटले. या प्रकरणाची सुनावणी आता पुढील गुरुवारी (12 ऑगस्ट) होणार आहे. या सुनावणीवेळी राज्य सरकारला आपली बाजू मांडायची आहे.

मुंबई लोकलमधून होणाऱ्या कोरोना संसर्गाचा दाखला दिला जातो. मात्र, बस आणि अन्य सार्वजनिक वाहनातून होणाऱ्या प्रवासावेळी होणाऱ्या गर्दीतून कोरोना संसर्ग होत नाही का? असा सवाल न्यायालयान विचारला. मुंबईसारख्या शहरात लोकल सेवा मुख्य गरज आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासास परवानगी देण्याच्या दृष्टीने विचार करा, असा सल्लाही न्यायालयाने दिला. (हेही वाचा, Mumbai Local: मुंबई लोकल यार्डात, मनसे कोर्टात; हस्तक्षेप याचिकेवर आज सुनावणी)

एएनआय ट्विट

पत्रकारांनाही लोकल प्रवास करण्यावर बंदी असल्याचे समजताच न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. इतर सर्व सेवा-सूविधा सुरु असताना विशिष्ट एखाद्या वर्गास अशा प्रकारचा मज्जाव करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत न्यायालयाने पुढील गुरुवारी होणाऱ्या सुनावणीवेळी आपली भूमिका स्पष्ट करावी अशा सूनचा न्यायालायाने केल्या.