Coronavirus: राज्यात दिवसभरात आढळले 11,088 कोरोना व्हायरस संक्रमित
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आज दिवसभरात राज्यात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. यातून बाकी राहिलेल्याची प्रकृती वैद्यकीय उपचारानंतर सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रासोबत मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा विचार करता मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठी आहे. मुंबई महापालिकने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 917 रुग्ण सापडले. तर 1154 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 48 रुग्णांची नोंद झाली.

मुंबई शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 125239 इतकी झाली आहे. त्यापैकी 99147 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 18905 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुंबईत आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 6890 इतकी झाली आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी ओळख असलेल्या धारावी परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडण्याचे प्रमाणही झपाट्याने घटत आहे. आज दिवसभरात या परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. या परिसरातील एकूण रुग्णांची संख्या आता 2,634 इतकी झाली आहे.