CIDCO: महत्वाची बातमी! कोरोना योद्ध्यांना नवी मुंबईत मिळणार स्वस्तात घरे, सिडकोचा निर्णय
Coronavirus Outbreak. (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाचे (Coronavirus) संकट परतवून लावण्यासाठी कोरोना योद्धा (Corona Warriors) अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे विविध स्तरावरून कौतूक केले जात आहे. याचदरम्यान, कोरोना युद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी दिले होते. या आदेशानुसार, सिडकोच्या योजनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना योद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईत जवळपास साडेचार हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मार्च 2019 पासून कोरोनाच्या महामारीने थैमान घालायला सुरुवात केली. तेव्हापासून वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्माचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात कोरोना महामारीशी लढत आहेत. याचपार्श्वभूमीवर कोरोना योद्धयांसाठी सिडकोने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनायोद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये 4488 घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या 5 परिसरांमध्ये ही घरे असतील. https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावरून या योजनेशी संबंधित सविस्तर माहिती, घरांचा तपशील, विविध प्रवर्गांकरिता राखीव घरे, अनामत रक्कम, योजनेचे वेळापत्रक इत्यादी गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यात प्रवेशासाठी दोन्ही डोस अनिवार्य, रिपोर्ट्स नसल्यास 14 दिवस क्वारंटाइन

भारतात उद्या 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचा आहे. देशात या दिवशी ठिकठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्यवीरांना स्मरण केले जाते. मात्र, यावर्षी स्वातंत्र्यवीरांसह कोरोना योद्ध्यांना राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायत स्तरावर सन्मानित केले जाणार आहे. यासाठी केंद्राकडून राज्य सरकारांना पत्र लिहले आहे. ज्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि कोरोनामुक्तांना आमंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे.