Maharashtra Assembly Elections 2019: 29 ते 31 जुलै दरम्यान होणार काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या विशेष मुलाखती
Congress Logo (Photo Credits: Wiki Commons)

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उमेदवार निवड प्रक्रियेची तयारीही जोरदार सुरु झाली आहे. विधानसभा निवडणूक (Assembly Elections)  लढविण्यास इच्छुक असणा-या उमेदवारांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज केले आहेत. या मुलाखती 29,30 आणि 31 जुलै रोजी जिल्हा मुख्यालय येथे घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. याला इच्छुक उमेदवारांनी भरघोस प्रतिसाद दिला. आता या मुलाखती काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयात 29 ते 31 जुलै रोजी होणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक मुलाखती घेऊन आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला देणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा- विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच होणार: बाळासाहेब थोरात

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आता निवडणूकीपूर्वी किती आमदार भाजपात प्रवेश करणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील आमदार भविष्यात शिवसेनेत प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान अलीकडेच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बैठकीत  विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (Congress-NCP Alliance) सत्तेत येईल आणि मुख्यमंत्रीही आघाडीचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला आहे.