Nana Patole On Rahul Gandhi: 'राहुल गांधी कश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना?'; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खळबळजनक वक्तव्य
Nana Patole On Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधी हे जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) या दौऱ्यावर असताना कश्मीरमध्ये बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटावरुन बोलताना नाना पटोले यांनी म्हटले आहे की, ''राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? '' नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरुन केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, जम्मू-कश्मीर दौऱ्यात राहुल गांधी यांनी खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल या दोन धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीसाठी राहुल गांधी सोमवारी जम्मू-कश्मीरमध्ये पोहोचले.

नाना पटोले यांनी म्हटले आहे की, 'राहुल गांधी हे जम्मू-कश्मीरला गेले होते. राहुल गांधी तेथे गेले आणि बॉम्बस्फोट झाला. याचा अर्थ काय? म्हणजे राहुलजींना तुम्ही....पुढचे मी बोलत नाही. यांनी (केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी सुरुवातीला काय सांगितले... आतंकवाद संपविण्यासाठी नोटबंदी केली. नोटबंदी केल्यावर आतंकवाद संपला का? नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये तर आलेच नाहीत. तो विषय गेला. पण आज आतंकवाद तर संपला का? आतंकवाद तर संपला नाही. पण, तुमच्या जवळ यंत्रणा आहे ना..? इतकी मोठी यंत्रणा असतानाही आतंकवादी राहुल गांधी असलेल्या परिसरापर्यंत पहोचोचूच कसे शकले?' असा सवाल विचारत 'राहुल गांधी यांना संपविण्याचा कट तर नाही ना?' असे प्रश्नार्थक वक्तव्यही नाना पटोले यांनी केले आहे. (हेही वाचा, Congress: कपिल सिब्बल यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधकांचे स्नेहभोजन, गांधी कुटुंबीयांच्या काँग्रेस नेतृत्वावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह)

फेसबुक पोस्ट

गांधी कुटुंबातील एक नव्हे तर दोन व्यक्तींनी देशासाठी रक्त सांडले आहे. या कुटुंबातील व्यक्तींचे रक्त या देशाच्या मातीत मिसळले आहे. अशा कुटुंबातील राहुल गांधी जनतेचा आवाज होऊन कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना संपविण्याचा हा कट तर नाही ना? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.