काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास आजपासून प्रारंभ
(Photo Credit: PTI)

महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीपिकाला हमीभाव यांसह अनेक मुद्द्यांवर काँग्रेसने सरकारविरोधात जनजागृती सुरु केली आहे. या जनजागृतीसाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले असून, जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास आजपासून (गुरुवार, ४ ऑक्टोबर) प्रारंभ होत आहे. जळगाव येथील फैजपूर येथून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होईल.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा पोहोचणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. आता दुसऱ्या टप्प्यातही जनता संघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद देईल असा विश्वास काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे सरकारकडून केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष, वाढती महागाई, इंधन दरवाढ आदी गोष्टींवरुन संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारला जाब विचारात २०१९च्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करायची, अशी काँग्रेसची रणनिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, केंद्रीय नेते मल्लिकार्जून खर्गे, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते आणि कार्यकर्ते जनसंघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत.

दरम्यान, ३१ ऑगस्टपासून जनसंघर्ष पहिला टप्पा कोल्हापूरपासून सुरु झाला होता. या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्हा काँग्रेसने पिंजून काढला होता. या टप्प्याचा शेवट पश्चिम महाराष्ट्रातील पुणे येथे झाली. या वेळी झालेल्या सभेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.