'सामना' मधील अग्रलेखावर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया- पहा महाविकास आघाडीतील 'बिघाडी' वर काय म्हणाले?
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या नाराजीनाट्यानंतर आघाडीत बिघाडीच्या चर्चांंना उधाण पहा सामना अग्रलेखावरील कॉंग्रेसचा पलटवार
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारला 6 महिने उलटल्यावर आता अंतर्गत कुरबुरी बाहेर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यात सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कॉंग्रेसला पुरेसं स्थान मिळत नसल्याची उघड चर्चा पहिल्यांदाच त्यांनी केल्याने आता महाविकास आघाडीत बिघाडी होतेय का? अशा चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. मात्र या चर्चांना पूर्णविराम लावत आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी आज मीडीयाशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान यावेळेस त्यांनी आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाचाही समाचार घेतला आहे.
काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय? अशा मथळ्याखाली आज सामनामधून कॉंग्रेसच्या नाराजीवर बोट ठेवण्यात आलं आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सामनामधील हा अग्रलेख अपुर्या माहितीच्या आधारे लिहला आहे. कॉंग्रेसचं म्हणणं ऐकून घ्या आणि सामन्यात पुन्हा अग्रलेख लिहा असा खोचक टोलादेखील त्यांनी मीडियाशी बोलताना लगावला आहे. (हेही वाचा, काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय?', शिवसेना मुखपत्र सामना संपादकियातून टोलेबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला)
आज शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ANI ला दिलेल्या माहितीमध्ये, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची चांगला समन्वय आहे. कोणी नाराज नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झालेली आहे. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाचे मत मुख्यमंत्री ठाकरे लक्षात घेतील. ते सार्यांचे ऐकून घेतात असेही राऊत म्हणाले. तर सामनातील अग्रलेखाबाबत विचारले असता ही सामना अग्रलेख लिखाणाची एक खास अशी स्टाईल आहे. असे बोलून विषय टाळला.
मुख्य सचिव अजॉय मेहता यांना मुदतवाढीवरून तिन्ही पक्षांमध्ये एकमत नाही, निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौर्याची तिन्ही पक्षांकडून वेगवेगळी पाहणी ते अगदी मागील महाविकास आघाडींच्या बैठकीत NCP अध्यक्ष शरद पवारांची उपस्थिती मात्र कॉंग्रेस नेत्यांची गैरहजेरी यामुळे आघाडीतील बिघाडी अनेकांच्या नजरेत आली होती.