चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: बल्लारपूर ते ब्रह्मपुरी चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
Chandrapur Matdar sangh (Photo Credits: Representative)

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघात जोरदार तयारी सुरु झाली असून त्यासाठी विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) मतदार संघात देखील ही जय्यत तयारी पाहायला मिळत आहेत. या जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा, राजुरा हे 6 मतदारसंघ येतात. या मतदार संघातील ब्रह्मपुरी आणि बल्लारपूर मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. यात ब्रह्मपुरी मध्ये काँग्रेसचे विजय वड्डेटीवार विरुद्ध शिवसेनेचे संदीप गड्डमवार असा सामना रंगणार आहे. तर बल्लारपूरमध्ये सुधीर मुनंगटीवार विरुद्ध काँग्रेसचे विश्वास झाडे ही लढत पाहायला मिळणार आहे. डॉ. विश्वास झाडे हे हृद्यरोग तज्ज्ञ आहेत.

चंद्रपूर शहर अनुसूचित जातीतील उमेदवारासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. विदर्भाचे पॉवर हब म्हणून चंद्रपूरकडे पाहिले जाते. चंद्रपूर मतदासंघाविषयी बोलायचे झाले तर दलित चळवळ आणि रिपब्लिकन पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करणारे नाना शामकुळे हे चंद्रपूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 1985 मध्ये पहिल्यांदा नागपूर महापालिकेत खोरिपचे नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2004 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 साली त्यांना राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. तिथून ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2014 सालीही त्यांनी आपला गड कायम राखला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी नानांविरुद्ध काँग्रेसच महेश मेंढे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर (Chimur) मतदारसंघाविषयी बोलायचे झाले तर, 1905, 2004 आणि 2014 वगळता सर्व निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या हाती सत्ता आलेली आहे. 2014 साली पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघातून सत्ता मिळाली. यंदा हा येथील निवडणुक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी रंगणार आहे. यात भाजपचे किर्तीकुमार भांगडिया विरुद्धा काँग्रेसचे सतीश वारजूकर अशी लढत पाहायला मिळेल. भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: भंडारा ते साकोली चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

ब्रह्मपुरी (Brahmpuri) मतदारसंघाविषयी बोलायचे झाले तर, यंदा शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे. तर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले विजय वड्डेटीवार विरुद्ध संदीप गड्डमवार अशी लढत रंगणार आहे. विजय वड्डेटीवर हे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

वरोरा (Warora) विधानसभा मतदारसंघातून सुरेश धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या काँग्रेसकडून उभ्या राहिल्या असून त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संजय देवतळे उभे राहिले आहेत. तसेच वंचित बहुजन समाजाचे अॅड. आमोद बावने आणि अपक्षकडून रमेश राजूरकर निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: गडचिरोली ते आरमोरी चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर (Ballarpur) मतदारसंघ आहे. मुनगंटीवार यांनी आतापर्यंत चार वेळा या मतदारसंघातून आमदारकी भुषवली आहे. राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या या मतदारसंघाने राज्याला माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्यासारखा नेता दिला होता. सध्या या मतदारसंघाला मुनगंटीवार यांचा मतदारसंघ म्हणून ओळखले जाते. या मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनंगटीवार विरुद्ध काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे ही लढत पाहायला मिळणार आहे.

राजुरा (Rajura) मतदारसंघात धोटे परिवाराचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्ष धोटेमय असल्याचे चित्र पाहायला मिळते. विधानसभा आणि पालिका अशा ठिकाणी धोटे कुटुंबातील सदस्य आलटून-पालटून सत्ता हस्तगत करतात. विद्यमान आमदार संजय धोटे भाजपकडून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यंदा राजुरा मतदारसंघातून भाजपचे संजय धोटे विरुद्ध काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

थोडक्यात चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकची लढत ही चुरशीची असून त्यात येत्या 24 ऑक्टोबर त्याचा अंतिम निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे असे म्हणायला हरकत नाही.