राज्यात बेकायदेशीर होर्डिंग लावले जात असल्याप्रकरणी हायकोर्टाची राजकीय पक्षांना नोटीस
High Court (Photo Credits-Facebook)

मुंबईसह (Mumbai) राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यांवर राजकीय पक्षाचे होर्डिंग लावलेले दिसून येतात. मात्र हायकोर्टाने (High Court) या प्रकरणी राजकीय पक्षांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच परवानगी न घेता होर्डिंग लावले जात असल्याचे ही कोर्टाने राजकीय पक्षांना सांगितले आहे. याबाबत येत्या 25 मार्च पर्यंत कोर्टाने राजकीय पक्षांना उत्तर देण्यासाठी वेळ देऊ केला आहे.

सुस्वराज्य फाऊंडेशन आणि भगवानजी रयानी यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस,बहुजन समाजवादी पार्टी यांना शुक्रवारी हायकोर्टाने कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. त्याचसोबत पुण्यातील रेल्वे स्थानकातील होर्डिंग कोसळल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या भरपाई बद्दल देण्यात येणाऱ्या रक्कमेवर न्यायालयाने खंत व्यक्त केली.

तसेच पुण्यात महापौर चषकाचे होर्डिंग्ज हे बेकायदेशीर असल्याचे याचिकार्त्यांनी खंडपीठास दाखवून दिले होते.याबाबत महापौरांकडून बेकायदेशीर होर्डिंग्जबाबत चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले होते.