जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून गायब झालेल्या 82 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळला; पोलिस तपास सुरू
या कोरोनाबाधित आजीबाई गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी 6 जून दिवशी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती.
महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे राज्याच्या विविध भागात आरोग्य यंत्रणेवर भार वाढत आहे. अशामध्येच ग्रामीण भागात अद्यावत आरोग्य सुविधांचा अभाव आणि कोरोनाची भीती असल्याने काही दुर्देवी घटना समोर येत आहे. अशात जळगाव (Jalgaon) मध्ये 2 जून पासून गायब असलेल्या 82 वर्षीय एका कोरोनाबाधित आजींचा मृतदेह शौचालयात आढळला आहे. या कोरोनाबाधित आजीबाई गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी 6 जून दिवशी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. दरम्यान या प्रकरणाबद्दल पोलिस तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
जळगाव मध्ये पोलिस तक्रार आल्यानंतर तात्काळ तपास सुरू झाला. रूग्णांचे रेकॉर्ड्स, अधिक तपशील, सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरूवात झाली. या 82 वर्षीय आजींची कोरोना चाचणी 27 मे दिवशी पॉझिटिव्ह आली होती. जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी त्या एका दुसर्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांना 2 जून पर्यंत पाहिल्याचं हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी सांगितलं होतं. मुंबई: कांंदिवली येथील शताब्दी रूग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाजवळ सापडल्याने खळबळ; विरोधकांकडून पालिका प्रशासनाच्या कामकाजावर टीका.
ANI Tweet
काल हॉस्पिटलमध्ये एका शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने तेथे तपास केल्यानंतर या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान या महिलेच्या कुटुंबाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधील भोंगळ कारभारावर लक्ष देण्यासाठी, दोषी कर्मचारी, अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रूग्नालयामध्ये एक 80 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब होते त्यानंतर त्यांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळला. राजावाडी हॉस्पिटलमध्येही कोरोनाबाधित रूग्णाचा मृतदेह गहाळ झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आली होती.