BMC Exam 2021 Cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाच्या लिपिकसह अन्य पदांसाठीच्या लेखी परीक्षा रद्द
BMC | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही चेन तोडण्यासाठी 'ब्रेक द चेन' हे अभियान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हाती घेतले आहे. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी आज रात्री 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) लिपिकसह अन्य पदांसाठीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर, मुंबई महानगर पालिकेनं लिपिकसह विविध पदांसाठीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या आहेत.हेदेखील वाचा- महाराष्ट्रात Lockdown नाही; उद्या रात्री 8 पासून लागू होतील नवे निर्बंध, 7 कोटी नागरिकांना एक महिना मोफत मिळणार 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ- CM Uddhav Thackeray

16 ते 18 एप्रिल दरम्यान विभागीय स्तरावर मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा घेतल्या जाणार होत्या. या परीक्षेसाठी पालिकेतले सुमारे 2 हजार 700 लिपिक सहभागी होणार होते. मात्र वाढत्या कोरोनामुळे ही परीक्षा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या गोष्टीची दखल घेत विद्यार्थ्यांनी घ्यावी असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन नाही तर, काही निर्बंध लागू केले जातील असे सांगितले. यामध्ये, राज्यात किमान 15 दिवस 144 कलम, संचारबंदी लागू असेल. राज्यात अनावश्यक येणे-जाणे होणार नाही. गरजेशिवाय कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतच अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतील. राज्यात सार्वजनिक वाहतूक सुरु असेल मात्र त्याचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच करू शकतील. हॉटेल्स, उपहारगृहे याठिकाणी टेकअवे चालू असेल असेही सांगितले आहे.