BMC Elections 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, नव्या वॉर्डसाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
BMC | (File Photo)

मुंबई महापालिका निवडणूक 2022 (BMC Elections 2022) साठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या निवणुका वेळेत पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मंबईमध्ये एकूण 227 वॉर्ड आहेत. यासोबतच मुंबई महापालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation) वॉर्डची संख्या 9 ने वाढवून ती 236 पर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे या वाढीव वॉर्डच्या आराखड्यानुसारही प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, वाढीव 9 वार्डबाबतच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या स्वाक्षरीची प्रतिक्षा असली तरी, जुन्या 227 किंवा नव्या 236 अशा दोन्ही वॉर्डरचनेपैकी कोणत्याही वॉर्डसंख्येनुसार निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला तरी प्रशासन मात्र सज्ज आहे.

दरम्यान, आगामी काळात राजकीयदृष्ट्या सोईस्कर भूमिका घेत महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या शक्यतेला पुष्टी मिळाली नसली तरी कुजबूज मात्र सुरु आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत काय निर्णय घेतला जातो याबाबत उत्सुकताआहे. मुंबईतील 9 वॉर्ड वाढविण्याबाबतच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही अद्याप झाली नसली तरी आगामी अधिवेशनात त्याबाबत विधेयक आणून कायदा केला जाईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (हेही वाचा, MNS In BMC Eelection 2022: परप्रांतियांचा मुद्दा कायम, मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मनसे 'एकला चलो रे’)

कोणकोणत्या ठिकाणी वाढणार नवे 9 वॉर्ड?

मुंबई पश्चिम उपनगरे- वॉर्डसंख्या 4 ते 5 ने वाढण्याची शक्यता

मुंबई पूर्व उपनगरे- वॉर्डसंख्या 3 ते 4 ने वाढण्याची शक्यता

मुंबई शहर- वॉर्डसंख्या 1 ने वाढण्याची शक्यता

मुंबईतील अनेक ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढलेल्या ठिकाणी वॉर्डसंख्याही वाढायला हवी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तर मुंबईसारख्या महाकाय शहरात केवळ 9 वॉर्डच का वाढवले जात आहेत? असा सवाल विचारत विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.