मुंबईत भाजप पक्षासाठी चौथी मेगाभरती 22 सप्टेंबरला होणार, नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह
Representative Image (Photo Credits: PTI)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांची घौडदौड सध्या पाहायला मिळत आहे. तसेच निवडणूकीच्या तारखा जाहीर अद्याप स्पष्ट केल्या नाहीत. तरीही राजकरणींमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी फार उत्सुकता दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भापज पक्षासाठी मुंबईत येत्या 22 सप्टेंबरला चौथी मेगाभरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात ही मेगाभरती होणार आहे.

चौथ्या मेगाभरतीसाठी नारायण राणे यांच्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे भाजपच्या मेगाभरतीत राणे सहभागी होणार का याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. परंतु भाजप कडून राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच चौथ्या मेगाभरतीत अजून कोण कोण प्रवेश करणार याबाबत आता बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी तारखा कधी ही जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी भाजप त्यांच्या पक्षात भरती करुन घेण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामधून ही भाजप पक्षात अद्याप इनकमिंग सुरुच आहे.(Mahajanadesh Yatra: नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश निश्चित; मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात मोठी घोषणा)

परंतु नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची तारीख अद्याप गुलदस्त्यात असून त्यावर कोणीही बोलायला तयार नाही आहे. मात्र आज नारायण राणे यांनी पुढील आठ दिवसात भाजप प्रवेशाबाबत भुमिका स्पष्ट करणार असल्याचे विधान केले आहे. तर भाजप-शिवसेना युती होईल की नाही याबद्दल नारायण राणे यांनी मला काही घेणेदेणे नसल्याचे म्हटले आहे. तसेच भाजप पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलणे झाल्याचे विधान सुद्धा नारायण राणे यांनी केले आहे.

तर गेल्या दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात महाजानदेश यात्रेचे स्वागत करताना नारायण राणे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या, ज्यानुसार, शिवसेना आणि भाजप यांच्या मध्ये कितीही वाद असले तरी आपण येत्या काहीच दिवसात भाजपात दाखल होणार असल्याचा विश्वास राणे यांनी दर्शवला. तसेच आपला पक्ष म्हणजेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपात विलीन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते.