भाजप नेते प्रसाद लाड यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; काय असेल या भेटीमागचं कारण?
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

Ajit Pawar Prasad Lad Meet: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या आधी अजित पवार यांनी भाजपाला साथ दिली होती, ज्यामुळे राज्यातील राजकारणाला मोठा धक्का बसला होता. परंतु, अजित पवारांनी लगेचच काही दिवसात फडणवीसांची साथ सोडत महाविकासआघाडीत परत यायचा निर्णय घेतला. परंतु, पुन्हा भाजप अजित पवारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. कारण आज भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. परंतु, प्रसाद लाड यांनी अजित पवारांची आज नेमकी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे अद्याप कळलेलं नाही.

अजित पवार हे आज सकाळपासूनच पुण्यात तिथली विविध कामं समजून घेण्यासाठी बैठका घेत होते. आणि असं असताना, प्रसाद लाड तिथे पोहोचले आणि त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. या दोन नेत्यांमधील ही भेट सर्किट हाऊस इथं झाली असून त्यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाली असं म्हटलं जातंय.

'सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट'; राज ठाकरे यांच्या छायाचित्रासह शिवसेना भवनसमोर मनसेची पोस्टरबाजी

या भेटीबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात असले तरी माध्यमांसमोर मात्र प्रसाद लाड यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर, बीड जिल्ह्यात भाजपने विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळेच तिकडे बीड विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे.