भिवंडीत मुसळधार पाऊस; 3 महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पिलंजे गावातील पूल रस्त्यासह वाहून गेला
Bhiwandi Bridge (Photo Credits: Youtube/ABP Majha)

मुसळधार पावसाने मुंबईत जरी विश्रांती घेतली असली तरीही ठाण्यातील ब-याचशा भागात पावसाची कोसळधार सुरुच आहे. या कोसळधार पावसाचा फटका भिवंडीतील पिलंजे (Pilanje) गावाला बसला असून या गावातील रस्त्यासह पूलही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदिवासी पाड्याला जोडणारा पूल वाहून गेल्याने येथील 5 आदिवासी पाड्यांचा संपर्क देखील तुटला आहे. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीही हा पूल पावसाळ्यात वाहून गेला होता.

त्यानंतप मार्च-एप्रिल 2019 मध्ये हा पूल नव्याने बांधण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच हा पूल पुन्हा वाहून गेल्यावर या पुलाच्या बांधकामावर आणि सरकारी यंत्रणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे म्हणजे सरळसरळ आदिवासी पाड्यांतील नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे दिसत आहे.

पिलंजे ग्रामपंचायत हद्दीतील भवरपाडा, बेंदरपाडा, नंबरपाडा, वारणापाडा, अडगापाडा या आदिवासी पाड्यांवक जाण्यासाठी जिल्हा परिषदेने एमएमआरडीएच्या माध्यमातून 80 लाख रुपये खर्च करुन 2018 मध्ये हा रस्ता आणि येथील बरेचसे पूल बांधले होते. मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात हा येथील रस्ता खचला असून येथील पूलही वाहून गेला.

हेही वाचा- सांगली, कोल्हापूरला महापुराचा फटका, कराड पाण्याखाली; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, हेल्पलाईन नंबर प्रसारित

या रस्त्यावरील पूल आणि हा रस्ता दोन ते तीन ठिकाणी खचल्याने आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी आणि रोजगारासाठी जाणा-यांना अनगाव, भिवंडीकडे जाण्यासाठी सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता पार करुन जावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास आम्ही कधीपर्यंतचा करायचा असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

मुळात अवघ्या तीन महिन्यांतच पूल वाहून गेलाच कसा असा सवाल येथील नागरिक करत आहे. यास जिल्हा परिषद, बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.