Beed Unseasonal Rain: बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Unseasonal Rain | Twitter

Beed Unseasonal Rain: बीडमध्ये शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने संध्याकाळ पर्यंत संपुर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात महादेव किसन गर्जे या 60 वर्षीय शेतकऱ्याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. जिल्हात काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच आब्यांच्या बागांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

मराठवाड्यातील अनेक भागात या अवकाळी पावसाचा फटका बसला. यापावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने लवकरच या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन त्यांना तातडीची मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक मंत्री हे सध्या अयोद्ध्या दौऱ्यावर असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाचे पंचनामे करण्यास विलंब होणार असल्याचे चिन्ह आहे.

अवकाळी पावसाचा फटका बीडच्या केज तालुक्याला सर्वाधिक बसल्याचे दिसत आहे. केज तालुक्यातील युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, विडा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. त्यामुळे आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल आणि मांगवडगाव दत्तू मुळूक यांची गाय वीज पडून दगावली आहे.