औरंगाबाद येथे आणखी 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने आकडा 1173 वर पोहचला
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना सुद्धा लॉकडाउनच्या काळात घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विळख्यात अडकले असून कोरोनाबाधितांचा आकडा वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान, आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे आणखी 54 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आकडा 1173 वर पोहचला आहे.

औरंगाबाद येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजारांच्या पार गेला आहे. यामध्ये नव्याने 54 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 28 महिला आणि 26 पुरुषांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.(अमरावती मधील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून 170 कैद्यांना 45 दिवस होम क्वारंटाइन)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39297 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 27589 जणांवर उपचार सुरु असून 1390 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यात कोरोनाचा वेग कमी झाला असून साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.