औरंगाबाद येथे आणखी 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आकडा 1407 वर पोहचला
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशासह महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने त्यांना रेड झोन घोषित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आज औरंगाबाद मध्ये 46 नव्या कोविड19 च्या रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील आकडा 1407 वर पोहचला आहे. त्यापैकी 901 जणांची प्रकृती सुधारली असून अद्याप 438 रुग्णांवप उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा विळखा आता वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा वेग मंदावला जरी असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. येत्या 31 मे पर्यंत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन कायम राहणार आहे. परंतु पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची शक्यता मीडिया रिपोर्ट्सनुसार व्यक्त करण्यात येत आहे.(पुणे जिल्हा परिषद कडून कोरोना संकटात गरजूंना काम मिळावं म्हणून मनरेगा विशेष रोजगार अभियान जाहीर; इथे करा अर्ज!)

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 2598 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 698 कोरोना संक्रमितांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या आता 18616 इतकी आहे. राज्यात आजघडीला कोविड 19 विषाणू संक्रमित रुग्णसंख्या 38939 असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.