Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

निवडणूक आयोगाने आज (18 जानेवारी) नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभा निवडणूकींसोबत महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील जाहीर केली आहे. कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) दोघांचेही कॅन्सरमुळे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आता केंद्रीय निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 27 फेब्रुवारी दिवशी मतदान होईल आणि 2 मार्च दिवशी मतमोजणी होणार आहे. नक्की वाचा: Assembly Elections 2023: नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभा निवडणूक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोन्ही भाजपाचे आमदार होते. आता त्यांच्या जागी भाजपा कुणाला संधी देणार हे पहावं लागणार आहे. 7 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुभा आहे. त्यानंतर 8 फेब्रुवारीला छाननी केली जाईल. 10 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल तर 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 2 मार्चला जाहीर केला जाईल.

57 वर्षीय मुक्ता टिळक यांचे निधन 22 डिसेंबरला पुण्यात झाले तर 3 जानेवारीला लक्ष्मण जगताप यांनीही जगाचा निरोप घेतला. दरम्यान या दोघांनीही गंभीर आजाराशी लढा देत असताना राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीदरम्यान दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पक्षनिष्ठा दाखवत अ‍ॅम्ब्युलंस मधून येऊन आपलं मतदान केले होते. त्यांच्या या कृतीने सारेच भारावून गेले होते.