Coronavirus: अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरस संक्रमित, पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला रवाना
Ashok Chavan | (Photo Credits-Facebook)

राज्याचे विद्यमान बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हालवण्यात आले आहे. या आधी त्यांच्यावर नांदेड (Nanded) येथे उपचार सुरु होते. चव्हाण यांची या आधी दोन वेळा कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली होती. त्या दोनही चाचण्या निगेटीव्ह आल्या होता. त्यानंतर चव्हाण यांची तिसरी चाचणी मात्र पॉझिटीव्ह आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चव्हाण यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना होण्यासाठी चव्हाण हे स्वत:हून रुग्णवाहिकेपर्यंत चालत आले. सध्या ते एकटेच मुंबईला निघाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य मुंबईला आला नसल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण)

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी चव्हाण यांच्यावरील उपचारांबाबत चर्चा केली आहे. काँग्रेसचे बरेच नेते मुंबईत आहेत. ते चव्हाण यांच्या प्रकृती बाबत आणि उपचारांबाबत लक्ष ठेऊन असणार आहेत. काँग्रेस आणि राज्यातील इतर अनेक नेत्यांनी अशोक चव्हाण यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. आपणही सर्वजण त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम मिळावा यासाठी प्रार्थना करु, अशी भावना काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.