NCP अध्यक्ष शरद पवार यांना थप्पड मारणाऱ्या, फरार आरोपीला तब्बल 8 वर्षानंतर अटक
शरद पवार आणि अरविंदर सिंह (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना थप्पड मारणारा, अरविंदर सिंह (Arvinder Singh) अटक करण्यात आली आहे. 2011 साली अरविंदर सिंहने शरद पवार यांना चापट मारली होती, त्यानंतर हा फरार होता. अरविंदर सिंह याला हरविंदर सिंह म्हणूनही ओळखले जाते. 2014 मध्ये दिल्ली कोर्टाने त्याला गुन्हेगार आणि फरार घोषित केले होते, त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर अरविंदरला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अरविंदर सिंह हा दिल्ली शहरातील रहिवासी आहे. अरविंदर सिंह याने यापूर्वी माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावर हल्ला केला होता.

नवी दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी ईश सिंघल यांनी सांगितले की, अरविंदर सिंह (36) हा दिल्लीतील सरूप नगर भागातील रहिवासी आहेत. त्याला मंगळवारी दिल्लीत अटक करण्यात आली. त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अरविंदरविरुद्ध प्रथम गुन्हा नवी दिल्ली जिल्ह्यातील कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर क्रमांक 209 वर नोंदविला गेला. (हेही वाचा: साताऱ्यात वरूणराजासोबत बरसले 'साहेब'; सोशल मिडीयावर शरद पवार यांच्या अचाट जिद्दीचे कौतुक, पहा Twitter Reactions)

दुसरा गुन्हा नवी दिल्ली जिल्ह्यातील संसद पथ पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक 112/12 वर ठार मारण्याच्या धमकीच्या कलमांखाली दाखल करण्यात आला. 24 नोव्हेंबर 2011 रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपीने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

शरद पवारांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. मात्र न्यायालयात खटला चालू असताना आरोपी फरार झाला. म्हणूनच 29 मार्च 2014 रोजी पटियाला हाऊस कोर्टाच्या मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी कुमारी प्रगती यांनी अरविंदर सिंह फरार घोषित केले होते.