Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video)
सदा सरवणकर यांच्या कोट वरील खाली झुकलेला धनुष्यबाणाचा बॅच सरळ करत अमित ठाकरेंनी प्रतिस्पर्धी सरवणकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रात हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray) विरूद्ध शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि उबाठा चे महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्यावरून शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि मनसे मध्ये समझोता होतो का? याकडे लक्ष लागले होते पण तसे न झाल्याने काहीसे संबंध ताणले गेल्यानंतर आज थेट मतदानापूर्वी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर योगायोगाने एकमेकांसमोर आले. यावेळी अमित ठाकरे यांनी पुढाकार घेत सदा सरवणकर यांची विचारपूस केली त्यांना शुभेच्छा दिल्या. निघताना त्यांनी सदा सरवणकर यांच्या कोट वरील धनुष्यबाणाचा बॅच उलटा झालेला पाहून तो सरळ केला. अमित यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. सोशल मीडीयातही हा व्हिडीओ वायरल होत आहे.
दरम्यान अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूकीत स्वतः उतरले आहेत. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार सदा सरवणकरांचं आवाहन आहे. आज सकाळी सहकुटुंब मतदानाला जाण्यापूर्वी ते प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनाला पोहचले. याचवेळी मंदिरातून सदा सरवणकर देखील बाहेर पडले. मीडीयाशी ते बातचीत करत होते पण निघता निघता त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अमित ठाकरे-सदा सरवणकर यांच्या भेटीत काय झाले?
अमित ठाकरे यांनी विजयाचा संकल्प बोलून दाखवला आहे. तर राज ठाकरे यांनीही विरोधात शिवसेना, उबाठा यांचे उमेदवार असले तरीही अमित ला निवडून आणणारच असं म्हटलं आहे. तसेच निकालांमध्ये अनेक सरप्राईजेस बघायला मिळतील आणि मनसे यंदा सत्तेत बसलेली असेल असेही ते म्हणाले आहेत.
आज महाराष्ट्रात 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या निवडणूकीचा निकाल 23 नोव्हेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.