Amit Shah's Two-Day Maharashtra Visit: अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, अहमदनगर येथील  सहकार परिषदेत काय बोलणार याबाबत उत्सुकता
Amit Shah | (Photo credit : Facebook)

केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Amit Shaha In Maharashtra) दौऱ्यावर येत आहे. शनिवारी (18 डिसेंबर) सकाळी 11 वाजता ते अहमदनगर (Ahmednagar) येथील प्रवरानगर येथे दाखल होतील. प्रवरानगर (Pravaranagar) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेसाठी (Co-operative Conference) शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधारण 20 हजार लोक उपस्थित राहतील असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, कार्यक्रमानिमित्त भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने भाजप नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली या सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ अहमदनगर येथूनच सुरु झाली. देशाचे सहकारमंत्री पद स्वीकारल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे सहाजिकच शाह यांच्या दौऱ्याला राजकीय आणि सहकार क्षेत्रातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा, Raj Thackeray on MVA: महाविकासाघाडी सरकार पडणार? राज ठाकरे यांचे मोठे विधान)

सहकारमंत्री या नात्याने अमित शाह कोणती मोठी घोषणा करणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण केंद्र सरकारने पाठीमागील काही दिवसांपासून संबंध देशभरातील सहकार क्षेत्राबाबत विशिष्ट धोरणे आखून तशी अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅंका यांच्‍या बाबतीत केंद्र सरकारने महत्‍वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्रालयावर सुरुवातीला अनेक शंका घेतल्या गेल्या. तसेच, टीकाही झाली. महाराष्ट्रातूनही या शंका उपस्थित झाल्या, टीकाही झाली. यावर अमित शाह काही उत्तर देतात की भाष्य करतात याबाबतही उत्सुकता आहे.

दरम्यान, या कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शवणार आहेत. तर रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील, साखरसंघाचे अध्‍यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्‍य सहकारी बॅंकेचे चेअरमन विद्याधर अनास्‍कर, राज्‍य सहकारी पतसंस्‍था फेडरेशनचे अध्‍यक्ष काका कोयटे यांच्‍यासह सहकारी चळवळीमध्‍ये काम करणारी मंडळीही उपस्थित राहणार आहेत.