Ramdas Athawale On MVA: अजित पवारांनी NDA ला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी कमकुवत होईल; रामदास आठवले यांचा दावा
अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी आणखी कमकुवत होत आहे.
Ramdas Athawale On MVA: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवारांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आणखी कमजोर होईल, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही शिष्टाचार भेट होती.
शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली. (हेही वाचा - Lalu Prasad Yadav On Ajit Pawar: म्हातारा माणूस कधी निवृत्त होतो का? राजकारणात रिटायरमेंट नसते? लालू प्रसाद यांचा शरद पवार यांना पाठिंबा)
उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, अजित पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र विधानसभेतील (सत्ताधारी पक्षाचे) संख्याबळ 200 हून अधिक झाले आहे. अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी आणखी कमकुवत होत आहे. MVA मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड करून ठाकरे यांचे एमव्हीए सरकार कोसळले. या बंडामुळे शिवसेनेतही फूट पडली. आता पुन्हा रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे.