बदलापूर येथील आदर्श स्कूल (Adarsh Vidya Mandir Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या घराची गावकऱ्यांनी तोडफोड केली आहे. तसेच, त्याच्या कुटुंबालाही गावातून हुसकून लावले आहे. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक गैरवर्तन आणि अत्याचार (Badlapur Sexual Assault Case) केल्याचा अक्षयवर आरोप आहे. पलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यास 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी, स्थानिक पालक आणि गावकरी यांच्या मनात अजूनही संताप कायम आहे. या संतापातूनच गावकऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबीयांना घरातून बाहेर काढले आणि खरवई गावातूनही हुसकून लावले.
स्थानिकांकडून बदलापूर बंद
बदलापूर येथील साडेतीन वर्षे वयाच्या दोन मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनामुळे गावकरी आणि पालक इतके संतप्त झाले की, त्यांनी शाळेची तोडफोड केली. तसेच, बदलापूर स्टेशनवर रेलरोको केला. पोलिसांनी कारवाई केली असली तरी, अद्यापही पालक संतप्तच आहेत. गावकऱ्यांच्या मनात राग धुमसतो आहे. या रागातूनच गावकऱ्यांनी आरोप अक्षय शिंदे याचे घर गाठले आणि त्यांनी कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या घराची तोडफोड केली, असा दावा अक्षयच्या कुटुंबीयांनी केला आहे. (हेही वाचा, Adarsh School Badlapur Sexual Assault Case: '...त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको', आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत शहरभर झळकले पोस्टर्स)
शिंदे कुटुंबीय मुळचे कुठले?
अक्षय शिंदे याच्या कुटुंबाबाबत अनेक चर्चा उलटसुलट पद्धतीने सुरु आहेत. दरम्यान, हे कुटुंब मुळचे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील असल्याचे सांगितले जात आहे. प्रदीर्घ काळापासून हे कुटुंब बदलापूर येथील खरवाई गावात राहते. तसेच, केवळ अक्षयच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंबच आदर्श स्कूलमध्ये साफसफाईचे काम करत होते. पाठिमागील अनेक दिवसांपासून हे कुटुंब या शाळेत काम करते. प्रामुख्याने शाळा सुटल्यानंतर सायंकाळच्या वेळी हे कुटुंब शाळेत साफसफाई करत असे. तसेच, अक्षय शिंदे याच्याकडे केवळ बाथरुम साफ करण्याचे काम होते, अशी माहिती त्याच्या आईवडीलांनी एबीपी माझा या वृत्तावाहिणीशी बोलताना दिली. शाळेत सीसीटीव्ही आहेत पण त्याबाबत आम्हाला फारशी माहिती नसल्याचेही शिंदे कुटुंबीयांनी म्हटले. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक)
दरम्यान, अक्षयच्या आईवडीलांनी दावा केला आहे की, आमच्या मुलाला पोलीस अचानक घेऊन गेले. आम्हाला शाळेकडून सांगण्यात आले की, तुमच्या मुलाला पोलीस घेऊन गेले आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलो तेव्हा पोलीस अक्षयला मारत होते. आम्ही कारण विचारले असता त्यांने लहान मुलांसोबत चुकीचे काम केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गावकऱ्यांनी आमच्या घरातही प्रवेश केला आणि काही समजायच्या आतच आम्हाला मारहाण केली. तसेच, घरातील साहित्यही बाहेर फेकल्याचे त्याच्या आईवडीलांनी सांगितले.