एका तरूणाची हत्या (Murder) करून रेल्वे ट्रॅकवर मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना जळगावच्या (Jalgaon) भुसावळ (Bhusawal) येथे घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींमध्ये संबंधित महिलेचा भाऊ आणि एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
दीपक सपकाळे (वय, 24) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक हा सुनोदा गावातील रहिवाशी असून घराशेजारीच राहणाऱ्या विवाहितेशी त्याचे अनैतिक संबंध होते. याची कुणकुण तिच्या पतीसह नातेवाईकांना लागली होती. याचदरम्यान, संबंधित महिलेने दिपकला शनिवारी रात्री तिच्या माहेरी यावल तालुक्यातील पाडळसा येथे बोलावून घेतले. त्यावेळी विवाहितेचा पती नितीन राजू धाडे आणि तिचा भाऊ हेमंत बाळू कोळी याच्यासह अन्य एका बालकाच्या मदतीने दीपकची हत्या केली. तसेच या हत्येचा उलगडा होवू नये, यासाठी आरोपींनी तरुणाचा मृतदेह जळगाव जवळील नशिराबाद हद्दीतील रेल्वे रुळावर फेकल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे. हे देखील वाचा-Ulhasnagar Murder: कामाचे पैसे मागायला आला म्हणून मालकाकडून मजुराची हत्या; उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, दीपकचा मृतदेह नशिराबाद हद्दीतील रेल्वे रुळावर सापडल्यानंतर पोलिसांना याबाबत वेगळाच संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच या तिंघानीच दीपकची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आणून टाकल्याचे कबूली दिली.