दिल्लीत पार पडली सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची बैठक; जाणून घ्या मिटिंगनंतरची संजय राऊत यांची प्रतिक्रिया 
File image of Sonia Gandhi with Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील परिस्थितीबाबत मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), द्रमुकचे खासदार टीआर बाळू, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या बैठकीमध्ये राजकीय विषांवर चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. याआधीही शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या आहेत.

आजच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘राज्यनिहाय विरोधकांची एकजूट हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. ही पहिलीच बैठक होती, उद्या (बुधवारी) पुन्हा भेटू, शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.’ त्याचवेळी राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनाबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माफी मागावी, या मागणीवर संजय राऊत म्हणाले, 'माफी नाही, खेद नाही, आम्ही लढू'.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज खासदारांच्या निलंबनाबाबत सांगितले होते की, मी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी माफी मागावी, खेद व्यक्त करावा आणि सभागृहात यावे. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांनी हा निर्णय असंवैधानिक आणि सदनाच्या नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे आणि माफी मागण्याचे नाकारले आहे. (हेही वाचा: Mumbai: काँग्रेसकडून येत्या 28 डिसेंबर रोजीच्या मुंबईतील रॅलीला स्थगिती)

याआधी सोमवारी, राज्यसभेतील खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या वर्तनावर आणि गदारोळावर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्ही असेच वागले तर मी सभागृह तहकूब करेन,’ असेही त्यांनी म्हटले होते. यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेससह इतर पक्षांसोबत वॉकआऊटची घोषणा केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. सोमवारी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले.