Coronavirus: औरंगाबाद मध्ये 74 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 824 वर पोहोचली
Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus: औरंगाबाद (Aurangabad) मध्ये आज 74 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 824 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 21 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय 229 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औरंगाबाद शहरातील 25 भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे औरंगबादमध्ये पुढील 3 दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता औरंगाबादमध्ये सर्व बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे, असंही केंद्रेकर यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Coronavirus: नाशिक शहरातील 759 पैकी 459 रुग्ण कोरोनामुक्त!)

दरम्यान, गुरुवारी औरंगाबादमध्ये 55 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली होती. तसेच आज 74 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला. राज्यात एकाच दिवशी 1602 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 27,524 वर पोहोचली आहे.