दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 7 वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; भिवंडी येथील घटना
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

भिवंडी (Bhiwandi) येथील समरुबाग परिसरातील इमारतीच्या पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून तो नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. अखेर गुरुवारी रात्री इमारतीच्या बेसमेंटला असलेल्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.

24 नोव्हेंबर पासून फारुकी बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतरर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर दीड महिन्यांनंतर इमारतीच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.

त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फारुकीच्या सांगाडा अवस्थेत सापडेलल्या मृतदेहाची ओळख पटली असून पोस्टमार्टमसाठी मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. (Thane: आईसह 3 मुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, वडीलांचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न)

संबंधित इमारत बंद असून बेसमेंट ला असलेल्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फारुकीच्या मृत्यूचा उलघडा करण्यासाठी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Mumbai: मालाड मधील अक्सा बीचवर महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, अधिक तपास सुरु)

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. कल्याण येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सातारा येथे आढळला होता. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. संदीप कदम असे या तरुणाचे नाव असून 20 डिसेंबर रोजी तो बेपत्ता झाला होता. 9 डिसेंबरला साताऱ्यातील वाई मधील मांढरादेवी मंदिरापासून जवळ असलेल्या एका दरीत त्याचा मृतदेह आढळला.