Coronavirus Lockdown च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील 2 दिवसांत तब्बल 5800 वाहनं जप्त- मुंबई पोलिस
Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील बाहेर पडणाऱ्या लोकांवर मुंबई पोलिस (Mumbai Police) कारवाईचा बडगा उगारत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 5800 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. 30 जून रोजी 3508 वाहनं जप्त केली असून 1 जुलै रोजी 2369 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे संकट दाट आहे. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे, नवी मुंबई शहरांमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली असून रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं, धार्मिक स्थळी भेटणं, फिरणं यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी 2 किलोमीटरच्या अंतराबाहेर जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. (Thane Lockdown: ठाणे शहरासह ग्रामीण भागात आजपासून सलग दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरु; केवळ 'या' अत्यावश्यक सेवा राहतील सुरु)

ANI Tweet:

दरम्यान अनलॉक 2 ला सुरुवात झाली असली तरी गाफिल राहून चालणार नाही. कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे खबरदारी घेणे, नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (28 जून) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. तसंच मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. विशेष म्हणजे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना केले आहे.