Coronavirus: अमरावती येथे आज 5 नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली
Coronavirus | Photo Credits: Unsplash

Coronavirus: अमरावती (Amravati) मध्ये आज 5 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती.

दरम्यान, रविवारी अमरावतीत 2 तर नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली. सध्या विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या 380 पेक्षा जास्त झाली आहे. रविवारी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत 30 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. (हेही वाचा - Coronavirus In India: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 42,533 वर पोहचला, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांची माहिती)

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तसेच राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 हजार पेक्षा जास्त झाली आहे. यातील 29,453 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 11,707 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे 1373 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातदेखील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहर तसेच उपनगरांतील आहेत.