COVID19: पुण्यात आज 3 कोरोना बाधितांचा मृत्यू; जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा 16 वर पोहोचला
Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

COVID19: पुण्यात (Pune) आज 3 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे. मंगळवारी पुण्यात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या 24 तासांत पुण्यात 8 जणांचा कोरोना व्हायरसमुळे बळी गेला आहे. यासंदर्भात पुणे आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

दरम्यान, आज पुण्यात सकाळपासून 25 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. संबंधित रुग्ण हे शहराच्या विविध भागातील आहेत. आज 25 नव्या रुग्णांची भर पडल्याने पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 154 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरधीर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे. तसेच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असं आवाहनही मुरधीर मोहोळ यांनी केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; सोशल मीडियावर दिली माहिती)

राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 1078 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात मुंबईमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय देशात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार पेक्षा जास्त झाली आहे. तर 150 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.