सांगली जिल्ह्यात आज 106 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांचादेखील समावेश
Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सांगली (Sangli) जिल्ह्यात 22 ते 30 जुलैपर्यंत लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने सर्व दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, वाहतूक, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज सांगली पोलीस दलातील (Sangli Police) 3 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात एक पोलिस अधिकारी आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेतील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वी मिरजेतील एका महिला पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.

आज सांगली जिल्ह्यात एका दिवसात 106 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मिरजेतील समता नगर भागात 57 वयाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा कोरोनाचा 42 वा बळी ठरला आहे. सांगली जिल्ह्यात बुधवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. काल दिवसभरात सांगलीमध्ये 106 नवे कोरोना रुग्ण सापडले. यात महापालिका क्षेत्रात 79 आणि ग्रामीण भागातील 27 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला. (हेही वाचा - केंद्र सरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा; उदय सामंत यांचं मोदी सरकारला आवाहन)

दरम्यान, सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 42 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. बुधवारी 195 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सांगली जिल्ह्यात आजअखेर 1214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 634 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच सध्या 538 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.