मुंबई: आईचा प्रियकर असल्याच्या संशयावरुन 37 वर्षीय तरुणाची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून केली हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

आईचा प्रियकर असल्याच्या संशयावरुन एका तरुणाने 37 वर्षीय तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. परवेझ शेख असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याची हत्या करणा-या आरोपीचे नाव शाहबाज शेख असे असून तो 21 वर्षांचा आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या आईचे आणि परवेझ चे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे.

माणसाच्या मनात असलेल्या संशयी वृत्ती माणसाला काय करायला लावेल याचा भरवसा नाही. याच वृत्तीचा असलेला आरोपी शाहबाजला आपल्या आईचे परवेझ शेख या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. 21 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने त्याच्या आईला आणि परवेझ शेख एका निर्जन स्थळी पाहिले. त्या दोघांना पाहून त्याचा राग अनावर झाला. आणि त्याने तिथेच त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळा रागाच्या भरात त्याने रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक उचलून परवेझच्या डोक्यात घातला. मुंबई: चारित्र्याच्या संशयावरुन माथेफिरु पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या

हा आघात इतका भयानक होता की, परवेझचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन आणि जबाबावरून शाहबाजला अटक केली. शाहबाजने परवेझची हत्या केल्याची कबुली दिली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत परवेझ हा 37 वर्षांचा असून तो रिअल इस्टेट एजंट होता.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात जन्मदात्या पित्याने आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात ठेवून आपल्या 5 महिन्याच्या गर्भवती मुलीची हत्या केली.  काळीज पिळवटून टाकणारी ही घटना मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडली. मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (20) असे मृत तरुणीचे नाव असून तिने वडिलांनी जमवलेली 2 लग्न मोडीत काढून त्यांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात आढळून आले.